शाब्बास..!! या चिमुकल्यानं चारली फिडे बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या आर. प्रगणानंदा याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. मूळचा चेन्नई येथील असणाऱ्या या चिमुकल्या बुद्धिबळपटूने फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या विद्यार्थ्याला हरवत भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला आहे. कोरोना संकटाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. याआधी विविध राष्ट्रीय पदकं मिळवलेल्या प्रगणानंद याने अगदी लहान वयात हे उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर त्याचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल प्रगणानंद याने देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानले आहेत. वेगवेगळ्या वयोगटांतील फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा सुरु असून भारताचे सर्वच खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी बजावत आहेत.

चीनवरील विजयामुळे अनेकांना देशप्रेमाचं वेगळंच भरतं आलं आहे. भारत आणि चीनमधील धुसफूस आता नवीन राहिलेली नाही. गलवान प्रांतात चीनने केलेल्या घुसखोरीवरुन भारतीय चांगलेच संतापले होते. यावेळी सीमेवरही बराच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संवादाच्या फेऱ्या झाल्यानंतर काही अंशी हा वाद मिटला. मात्र चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी आजच सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’