छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या गटात जाणार?? चर्चांचा जोर वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळवल्या आहेत. त्यामुळेच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील अनेक नेते पुन्हा एकदा घरवापसी करतील अशी चर्चा रंगली आहे. यात पक्षातील अंतर्गत वादामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील नाराज असल्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास याचा मोठा परिणाम राजकीय वर्तुळावर होईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधून लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले होते. पुढे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र छगन भुजबळ यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी आणखीन वाढली आहे. यामुळेच सोमवारी पार पडलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला असल्याचे समोर आले आहे.

या बाबतचीच माहिती देत छगन भुजबळ यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे की, सध्या छगन भुजबळ यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे ते या पर्यायांचा सारासार विचार करून योग्य ते निर्णय घेतील. नुकतीच समता परिषदेच्या बैठकीत याबाबत ही चर्चा झाली आहे. परंतु अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असले तरी छगन भुजबळ लवकरच अजित पवार गटातून बाहेर पडतील हे निश्चित आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या पक्ष सोडण्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.