शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट, पण लोककल्याणाची सर्वथा जाणीवही; वाढदिवशी संभाजीराजेंची भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार आणि छत्रपती संभाजी राजे यांचा आज 11 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी आपल्या ट्विट अकाउंट वरून भावुक पोस्ट शेअर केली आहे. शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे मला लोककल्याणाची सर्वथा जाणीवही आहे असे संभाजीराजे यांनी म्हंटल आहे.

आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे. असे संभाजीराजे यांनी म्हंटल.

छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे. माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील !

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची… असे ट्विट संभाजीराजे यांनी केलं.