कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिह यादव यांनी सत्कार केला. तसेच कराडला भेट देण्याची विनंती केली, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी भेटीचे निमंत्रण स्विकारले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपण पुढील आठवड्यात सातारा जिल्हा दौर्यावर येत असुन यावेळी कराडला येणार असे अश्वासन दिले असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले..
कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करणेसाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुधीर एकांडे, सचिन पाटील, पवन निकम, प्रदिप साळुंखे, शरद कणसे, राम रेपाळे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी यशवंत आघाडीच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती दिली. विशेषत स्वच्छ सर्वेक्षणमधे सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहीती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांनीही लक्षपुर्वक समजुन घेवून काही उपयुक्त सुचना देवुन कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिल्याचेही श्री. यादव यांनी सांगितले.
शिंदे गटासोबत यशवंत विकास आघाडी?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे गटाने आपली स्वतंत्र यंत्रणा राबवत, तालुका पातळीवर माणसं उभी करण्यास सुरूवात केली आहे. कराड येथे राजेंद्रसिंह यादव आणि ठाण्यातील एक पदाधिकारी यांची मागील आठवड्यात भेट झाली होती. त्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीमुळे आता राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत आघाडी शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.