आता खऱ्या अर्थाने देशाला सर्वसामान्य जनतेची ताकद कळली; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचे असे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. “कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट करीत प्रतिक्रिया दिली असून त्यात त्यांनी म्हंटले आहे की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.

असो, आता सरकारला उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे.

केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment