Sunday, June 4, 2023

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेत निर्बंधात शिथिलताही दिली आहे. त्यामुळे नागरिकांमधून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आता आपल्याला गणेशोत्सव व इतर सण मोठ्या उत्साहात साजरे करता येणार अशी स्वप्ने लोक पाहत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातील ऑक्सिजन साठ्यात वाढ होत नसल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी एका कार्यक्रमात म्हंटले आहे.

राज्य सरकारच्यावतीने राज्यातील निर्बंधात शिथिलता देत सर्व दुकाने पुन्हा सुरु झाली. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंच्या निर्बंधांमधील शिथिलतेच्या निर्णयाचे नागरिकांचन स्वागत करण्यात आले. हळू हळू सर्व सुविधा सुरुही झाल्या. मात्र, आज मुंबईतील सांताक्रूझ येथे बाल कोविड काळजी केंद्राच्या उद्धघाटन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी पुन्हा राज्यात लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, देशात इतर राज्यांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडे याचा धोका वाढणार नाही याची आपण काळजी घेतच आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. आपण जर नियम पाळले नाहीत तर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. सध्या गर्दीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात अजूनही कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रीक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल.