चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’

औरंगाबाद – राज्माची पर्यटन राजधानी औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेला वेग दिला जात आहे. निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमानतळाचा नकाशा तयार होताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात रायपूरसोबत औरंगाबाद अशा एकत्रितपणे विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर 2021 मध्ये देशातील 13 विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला. या 13 विमानतळांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. देशातील अमृतसर, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी या 6 मोठ्या विमानतळांचे आणि हुबळी, तिरुपती, औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर, गया या 7 छोट्या विमानतळांचे खासगीकरण करण्याचे ठरले.

चिकलठाणा विमानतळावरील सोयी-सुविधा आता चांगल्या आहेत. खासगीकरणामुळे त्यात पुढे आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, विमानतळाचे खासगीकरण होणार आहे. सध्या विमानतळ जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरु आहे.