जालना | पाऊस चालू असताना घराची भिंत अंगावर पडून आठ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली, तरआजी आजोबा जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे तालुक्यातील ढासला येथे घडली. श्रावणी मदन संगोळे ही 8 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली. तर शांताबाई सोनवणे (वय 60) व सारंगधर विश्वनाथ सोनवणे (वय 65) हे दोघे जखमी होते.
तालुक्यातील ढासला येथे मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने भिंत कोसळली. आठवर्षीय चिमुकली ढिगाऱ्याखाली दबल्याने जागीच ठार झाली. तर तिचे आजी-आजोबा जखमी झाले. त्यांना अशोक नाईक, राजू सोनवणे, शिवाजी सोनवणे यांनी बदनापूर येथील रुग्णालयात दाखल केले व आजची शांताबाई सोनवणे गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
पाच वर्षांपूर्वी 2015 साली या गावात महापुरामुळे 200 ते 250 घरे दुधना नदीच्या पुराने पडली होती. त्यावेळेस पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली होती. परंतु हे घरे पक्के बांधून देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार यांनी गावकऱ्यांना दिली होते. पक्की घरे मिळाली नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.