मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो.
वरच्या मजल्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
सिडको कडून तब्बल 26 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती एका मराठी टीव्ही माध्यमाकडून देण्यात आली आहे.अगदी ३ दिवसांतच या योजनेचा शुभारंभ होणार असून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे. मात्र या मोठ्या योजनेबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून . यातील घरांच्या किंमती मजल्यानुसार आकारल्या जाणार असून वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
किती भरावा लागणार शुल्क ?
सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत २६ हजार घरांच्या ठरावाला मान्यता मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून 27 ठिकाणी 67 हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना महारेराची परवानगी मिळाली आहे. यातील 26 हजार घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच यामध्ये बावीस मजली इमारतींतील घरांच्या किंमती मजल्यानुसार ठरणार आहेत. सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट 10 रुपये अतिरिक्त आकारणी होणार आहे. त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच 20, 30 आणि 40 असे वरच्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हला वरचा मजला पाहिजे असेल तर त्यासाठी थोडे जादा पैसे भरावे लागणार आहेत.
कोणत्या भागात मिळणार घरे ?
या लॉटरी मध्ये 13 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यातील सर्वाधिक जवळपास 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. खांडेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. तसेच जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही.
घराच्या विक्रीसाठी एनओसीची आवश्यकता नाही
याबरोबरच महामंडळांना आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळनिर्मित घरांच्या विक्रीसाठी महामंडळ एनओसीची आवश्यकता आता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीला घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लिजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचा होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घर विकण्यासाठी सिडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत होती. याशिवाय ही घरं विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत होते. मात्र नव्या निर्णयामुळे हा नियम रद्द करण्यात आल्याने सिडकोच्या गृहधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.