Sunday, May 28, 2023

बलात्कार प्रकरणात दोन वर्षापासून फरार संशयितास सिनेस्टाईल अटक

फलटण | गेल्या दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या संशयित आरोपीस बरड पोलिसांनी अटक केली आहे. वाजेगांव येथे घरी आल्यानंतर तेथून पळून जायच्या तयारीत असतानाच सिनेस्टाईल पाठलाग करून बरड पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. संदीप धनाजी भोसले असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.

बरड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निंबळक (ता.फलटण) येथील संदीप धनाजी भोसले हा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षा पासून फरार होता. संशयितांचा बरड पोलीस कसून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो वाजेगांव येथे घरी येणार असल्याचे माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या पोलीस टीमसह सापळा रचला. संदीप भोसले पळून जायच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केले. पोलीस अंमलदार गणेश अवघडे, पोलीस कॉस्टेबल यादव यांनी ही कारवाई केली.

या कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे व पोलीस जवानांचे अभिनंदन केले. याचा अधिक तपास बरड पोलीस दुरक्षेञाचे सहाय्यक निरिक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.