पुणे । कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची किंमत सिप्ला कंपनीने कमी केली असून, आता अवघ्या २,२०० रुपयांत ते रुग्णांना उपलब्ध होणार आहे. या इंजेक्शनची किंमत बाजारात ५ हजार ४०० रुपयांवरून २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविले आहे. पुणेकरांसाठी रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याचा साठा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे.
पुण्यात अमित देशमुख यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा झाली. पुण्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याने डॉ. लहाने यांनी चार उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला. त्या वेळी कंपन्यांकडे 1 लाख व्हायल इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार ७२ तासांपूर्वी ऑर्डर नोंदविल्यास इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन उत्पादकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. लहाने यांनी या बैठकीत सिप्ला कंपनीने १०० मिलिग्रॅम ‘रेमडेसिव्हीर’च्या इंजेक्शनची किंमत ५,४०० वरून सुमारे २,२०० रुपयांपर्यंत कमी केल्याचे पत्र जारी केल्याची माहिती दिली. हे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारी, खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे, असेही जोशी यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.