अहमदनगर प्रतिनिधी। सरकारने रस्ते बनवण्यावर अधिक भर दिला असला तरी जे पूर्वीचे रस्ते आहेत त्याकडे मात्र दुर्लक्षच केले असल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिर्डी ते हैद्राबाद महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असुन, या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही दखल न घेतल्याने गुरुवारी खर्डा ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील खड्डात बसुन आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी खर्डा सरपंच संजय गोपाळघरे, भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, उपसरपंच संजय सुर्वे, माजी सरपंच शिवकुमार गूळवे, भागवत सुरवसे, संतोष थोरात एजाज झिकारे, विजय श्रीसगर,प्रशांत कांबळे, बाबासाहेब चौदार, बळी दराडे, बापू ढगे, आदींनी हे आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान शिर्डी – हैदराबाद राज्य महामार्गावर खर्डा परिसरात गेली अनेक दिवसांपासून खडे पडून वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. परंतु त्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने अखेर नागरिक रस्त्यावर उतरले असून, रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलनाला सुरवात केली आहे.