कापड मार्केटला आग लागल्याच्या अफवेने नागरिकांची पळापळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज मार्केटमध्ये अचानक दिसू लागलेला धुरांचा लोट, कापड मार्केटला आग लागल्याची आलेली बातमी आणि नागरिकांची झालेली गर्दी. अशातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या … मात्र प्रत्यक्षात पाहिले तर काय भुईकोट किल्ल्याच्या खंदकात आग… अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग अटोक्यात आणली. मिरज मार्केटमध्ये सर्वत्र धुरीचे लोट दिसत होते. एकीकडे कापड मार्केट पेटलं तर दुसरीकडे देवल चित्रमंदिराला मोठी आग लागली, अशी अफवा शहरात फिरत होती.

आग लागल्याची ही अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र जात होती. नागरीक देवल चित्रमंदिराजवळ आल्यानंतर याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंदकात आग लागल्याचे दिसून आले. मात्र ही आग लागली होती की लावली होती हा संशोधनाचा विषय आहे. कारण अशा पध्दतीने खंदकातील कागदांना आग लागणेे नवीन नाही. त्यामुळे ही आग लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली.

मार्केटमधील सर्व कापड पेठेतील तसेच अनेक दुकानातील कचरा हा या खंदकात टाकला जातो. त्यामुळे या खंदकात प्लॅस्टीकचे कागद, पट्टू, वायर, अनेक प्रकारच्या वस्तू येथे पडलेल्या असतात. त्यामुळे कोणीतरी आग लावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खंदक खोल असल्याने खंदकात सर्वत्र धुरीचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिन बंबांच्या मदतीने खंदकातील ही आग आटोक्यात आणली.