ऑक्सिजनची नागरिकांना आवश्यकता भासूच नये – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

औरंगाबाद | कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. यासाठी सर्वांनी जबाबदारीने या संकटापासून वाचण्यासाठी सातत्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) याचे पालन करणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए प्लांट) आज लोकार्पण झाले. तरी या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या ऑक्स‍िजनची अधिक आवश्यकता भासू नये, अशी इच्छा पर्यटन, पर्यावरण आण‍ि राजश‍िष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच या सुविधेची गरज भासली तरी येथे येणारा प्रत्येक रूग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतावा, असेही ते म्हणाले. एमआयडीसी चिकलठाणा येथील मनपाच्या मेल्ट्रॉन हॉस्पीटल (डीसीएचसी) इमारत परिसरात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर ऑनलाइन माध्यमातून ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, मनपा आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, दीपक फर्टिलायझरचे सरव्यवस्थापक हनमुंतराव भिसे, कार्यकारी उपाध्यक्ष नरेश देशमुख आदींची उपस्थिती होती. तसेच ऑनलाइन माध्यमातून सचिन अहिर उपस्थित होते.

मंत्री ठाकरे म्हणाले, कोविड काळात आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येत काम केले. यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनासह खासगी क्षेत्रातील प्रत्येकाने सर्वतोपरी मदत केलेली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्स‍िजनची आवश्यकता राज्याला भासू लागली. याचा अनुभव लक्षात घेऊन राज्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर भर दिला. जेएसडब्ल्यू, बजाज, रिलायन्स आदी उद्योगसमूह यासह इतर अनेक उद्योग समूह यासाठी पुढे आले. अनेक आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने त्यांनी कार्य केलेले आहे. मेल्ट्रॉन परिसरात उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प दीपक फर्टिलायझरच्या माध्यमातून उभारलेला आहे, निश्च‍ितच ही समाधानाची बाब असल्याचेही ठाकरे म्हणाले. नागरिकांनीही कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. ‘माझी कुटुंब माझी जबाबदारी’ याप्रमाणे कोविडचा प्रसार होणार नाही, म्हणून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री देसाई यांनी मनपाच्या मेल्ट्रॉन इमारत परिसरात सुरू झालेला ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्प, या रूग्णालयात अधिक सुविधेची भर घालणारा आहे. या डेडिकेटेड कोविड केअर सेंटरसाठी उद्योग विभागाने पुढाकार घेतला. एमआयडीसीकडे असलेल्या मेल्ट्रॉन इमारतीला सुसज्ज करून याठिकाणी कोविड रुग्णांसाठी हॉस्पीटलची उभारणी झाली. या हॉस्पीटलच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात औरंगाबादकरांची सेवा करण्यात आली. जवळपास साडे सात हजारांहून अधिक रुग्ण याठिकाणाहून बरे होऊन गेले. नागरिकांनी या रुग्णालयातील सुविधेबाबत समाधानही व्यक्त केले, हीच या हॉस्पीटलच्या नागरिकांना दिलेल्या सेवेची पोचपावती आहे. तरीही नागरिकांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन गर्दीत जाणे टाळावे, शासनाने सूचविलेल्या सूचनांचे पालन करावे, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्प मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने औरंगाबादेत उभारण्यात आला, याबद्दल त्यांना धन्यवादही देसाई यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडेय यांनी केले. यामध्ये त्यांनी मेल्ट्रॉन इमारतीतील डीसीएचसीला अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासानाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनही यासाठी मोठ्याप्रमाणात मदत करत आहे. या रुग्णालयातून अनेक कोविड रुग्णांना दिलासा मिळाला. नागरिकांची सेवा मोठ्याप्रमाणात या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आली, असे सांगितले. मेल्ट्रॉन परिसरात उभारलेल्या ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्पाबद्दल मनपा प्रशासनाच्यावतीने ठाकरे आणि देसाई यांचे आभारही पांडेय यांनी मानले.

बजाज समुहासोबत सांमजस्य करार 
जिल्ह्यात बजाज समूह आणि बजाज ऑटो यांच्यावतीने दोन लक्ष 30 हजार कोव्हीशिल्ड लस नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी देण्यात येणार आहेत. याबाबत मनपा, जिल्हा प्रशासन आणि बजाज समुहात सांमजस्य करार झाला.