चिपळूणमध्ये ढगफुटी : मदतीसाठी सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर मार्गे चिपळूणला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काल एनडीआरएफचे पथक उशिरा चिपळूणमध्ये दखल झाले. त्यानंतर आज चिपळूण मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुण्याहून सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण – कोयना नगर मार्गे चिपळूण सकाळी रवाना झाल्या आहेत.

बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. या ठिकाणी अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे येथील प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. रात्रभर पडलेल्या ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान एनडीआरएफची एक तुकडी पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. त्यांच्यानंतर आज पुन्हा येथील नागरिकांचे बचाव कार्य अतिवेगाने सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी नौदलाचे हेलिकॉप्टर महाडला दाखल झाले असून चिपळूणला निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत मदतकार्य पोहचवण्यासाठी पुण्याहून भारतीय सैन्यदलाची मदत जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर मार्गे चिपळूण मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. या गाड्या अतिवेगाने चिपळूणचा दिशेने जात असून या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्याचा प्रयत्न सैन्यदलाकडून केले जात आहेत.

Leave a Comment