हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरे मेट्रो कारशेड वरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जातो कारण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदी असताना आरेतील कामांना स्थगिती देऊन कारशेड साठी कंजूरमार्गची जागा निवडली होती.
२०१४ नंतर युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबई मेट्रो-३ लाईनच्या कारशेडसाठी आरेतील जागा निश्चित केली होती. मात्र त्यावर पर्यावरण प्रेमी, वन्यप्राणी संघटनांसह अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.
आता पुन्हा राज्यात भाजप- शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर आरेमध्ये मेट्रो कारशेडमध्ये असलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे- ठाकरे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेड आरे मधेच होईल असं सूचक विधान यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे.