कोलकाता । पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत अन्नधान्य पुरवण्यात येईल, असं आश्वासन व्हर्च्युअल रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दिलं.
“आम्ही लॉकडाउनच्या आधीपासूनच मोफत अन्नधान्य पुरवत होते. १० कोटी लोकांना मोफत अन्नधआन्य दिलं जात आहे. एवढंच नाही तर जून २०२१ पर्यंत आम्ही मोफत अन्नधान्य देत राहू,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि दिल्लीकडून आम्हाला जी वागणूक मिळाली आहे त्याचा नक्कीच बदला घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. “बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला पश्चिम बंगालवर राज्य करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्हाला पुन्हा कसं उभं राहायचं हे माहित आहे. तृणमूल काँग्रेसला कोणीही दुबळं समजू नये,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“कोणीही विकासाबाबत काही बोलत नाही. आम्हाला बंगालमध्ये केवळ ८ वर्षे मिळाली. परंतु केंद्र सरकार बंगालमध्ये कठीण परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपलं कार्ड खेळत आहे. त्या सर्वांनी बंगालमधील गावांमध्येही जावं आणि पाहावं की बंगाल किती शांत आहे,” असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. “आम्ही एनआरसी आणि सीएएला विसरलो नाही. दिल्लीत लोकांना मारून नाल्यात फेकून देण्यात आलं. बंगालमध्ये करोनाचं संकट आहे याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एनआरसी आणि सीएए विसरलो आहोत,” असं नमूद करत देशातील नागरिक कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार राज्याला असल्याचे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”