हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देशात निवडणुकीतील एकामागून एक पराभवाने अस्ताच्या दिशेने जात असलेली काँग्रेस (Congress) आता एका नव्या आरोपाने पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ५०० कोटी रुपये लागतात असा थेट आरोप नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केला आहे. सिद्धू यांच्या या आरोपाने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे.
काय म्हणाल्या नवज्योत कौर सिद्धू?
नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या की, काँग्रेसने अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तरच त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू सक्रिय राजकारणात परततील. परंतु त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यांनी आरोप केला की, जो कोणी ५०० कोटी रुपये असलेली सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. यावेळी त्यांनी असेही म्हंटल कि, त्यांना कोणीही पैसे मागितले नाहीत, परंतु सर्व व्यवस्था अशा प्रकारे काम करते. नवज्योत कौर सिद्धू पुढे म्हणाल्या, पंजाब काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, काँग्रेस पक्षातील किमान ५ नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. हेच नेते सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करू इच्छित नाहीत. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबतबद्दल बोलतो, परंतु मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत.
दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेतृत्वाने कौर यांच्या गंभीर आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे असे भाजपने म्हटले आहे. कौर यांच्या विधानाचा दाखला देत भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री होण्यासाठी किमान ५०० कोटी रुपये द्यावे लागतात, अन्यथा ते अशक्य आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला आहे. भ्रष्टाचार आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहिले पाहिजे. ते पक्षाच्या आत आणि बाहेर लोकशाहीचे शत्रू आहेत. कौर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पूर्णपणे उघडकीस आली आहे. काँग्रेसवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी त्यांच्या “कौरेज अँड कमिटमेंट” या पुस्तकात लिहिले आहे की, २००८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्व जागा सर्वाधिक बोली लावणाऱ्याला कशा लिलाव केल्या जात होत्या.




