हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाची पुढील लाट ही आधीच्या लाटेपेक्षा भयंकर असण्याची शक्यता व्यक्त केली. आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न घालणे यांसह विविध विषयांवर भाष्य केलं.
कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं, असंही आवाहन केलं.
कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
सर्वकाही खुलं केलंय म्हणजे कोरोना गेलाय असं समजू नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर कोरोना वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना घातक ठरतो. आताच्या लाटेत तरुणांना देखील संक्रमण होतंय. हे फार गंभीर आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करुन तरुण घरी वावरले तर ज्येष्ठांना त्रास होणार आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’