कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स काम करेल – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून बऱ्या झालेल्या ६ महिन्यांच्या बाळाचं आणि ८३ वर्षांच्या वृद्धेच उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी लढा योग्य दिशेने सुरू केल्याचं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संचारबंदीचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवल्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रतिसाद देशभर पाहायला मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री ८ वाजता घेतलेल्या जनता संवादामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करत आपल्या मनोगताला सुरुवात केली. भीमसैनिकांनी घेतलेली शांततेची भूमिका कौतुकास्पद असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. घरीच साजऱ्या केल्या गेलेल्या भीमजयंतीचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला, आपण विषाणूविरुद्ध लढत आहोत याचा उल्लेख त्यांनी केला.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. याशिवाय डॉ रघुनाथ माशेलकर आणि इतर वैज्ञानिकांची मदत घेऊन संकटाच्या काळात वाचण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला असल्याचं उद्धव ठाकरेंनी पुढे बोलताना स्पष्ट केलं. बळीराजा हा संपूर्ण देशाचा आत्मा असून संचारबंदीतही शेतकऱ्यांची कामं बंद राहणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. २० तारखेपर्यंत राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेत शक्य ते बदल करण्याचा विचार राज्य आणि केंद्र सरकारही करत असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.

कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली असून यामध्ये तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ काम करून लवकरात लवकर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. प्लाझ्मा ट्रीटमेंट आणि बीसीजी वॅक्सीनची चाचणी महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयोग चालू असून लवकरच यावर केंद्राच्या परवानगीने अंमलबजावणी सुरु होईल असंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. डॉक्टरांसाठी आवश्यक असलेल्या पीपीई किटचा तुटवडा असला तरी त्यावर मार्ग काढत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

पहा हॅलो महाराष्ट्रवर- 

Uddhav Thackeray Live

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment