Monday, February 6, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहलं कोविड योद्ध्यांना भावनिक पत्र

- Advertisement -

मुंबई । महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आज डॉक्टर पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाची सेवा करत आहेत. या कोविड योद्ध्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय हे युद्ध आपल्याला शस्त्राने नाही तर सेवेने जिंकायचे आहे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याचबरोबर कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत.

आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात आपण मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोना साथीच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या संकटात एक ‘सैनिक’ बनून आपण मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी या पत्रात मांडल्या आहेत.

- Advertisement -

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धा आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुढे नमूद केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”