मुख्यमंत्री पिकनिकला आल्यासारखे आले अन् गेले; ठाकरेंच्या सातारा, रत्नागिरी दौर्‍यावर शेतकरी संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोयनानगर । सकलेन मुलाणी 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा केला. मुख्यमंत्री ठाकरे यांचे १० वाजता कोयनेत आगमन झाले. त्यानंतर ते थेट चिपळून पोफळीच्या प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी निघाले. तेथे बोगदा, प्रकल्पाची पहाणी केली. त्यानंतर ते 12.30 वाजता कोयनेत आले. थेट कोयना धरणाच्या भिंतीवर जावून तिथे त्यांनी विविध भागाची पहाणी व प्रकल्पाची माहिती जावून घेतली. त्यांच्या सोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल बाबर व महेश शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री पिकनिकला आल्यासारखे आले अन् गेले अशी टीका बळीराजा शेतकरी संघटनेने आजच्या दौऱ्यावर केली आहे. उद्धव ठाकरे कोयनानगर येथे पोहोचले असता ते कुणालाही न भेटता निघून गेले अशी तक्रार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो. मात्र, मुख्यमंत्री आम्हाला किंवा कुणालाही न भेटता आले आणि गेले. त्यामुळं मुख्यमंत्री नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आले होते कि पर्यटनासाठी? असा सवाल बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. याशिवाय यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक दौऱ्यात बळीराजा संघटना जिथे कुठे असेल तेथे विरोध करेल असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शेतकरी संघटनेच्या टीकेवर विचारले असता ते म्हणाले,”राज्याचे कुठलेही मंत्री तसेच मुख्यमंत्री एखादा प्रकल्प पाहत असताना पर्यटनाला येत नाहीत. आजच्या वीज प्रकल्पाच्या पाहणीत मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या. तेथील प्रश्न समजून घेतले. त्यामुळं ते फक्त पर्यटनासाठी आले होते असं म्हणणे चुकीचं असल्याचे,” बाळासाहेब पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment