सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला ; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या घोषणेवरून राज्याचे सहकार तथा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्राने हे कृषी कायदे रद्द केले आहेत. त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

राज्याचे सहकार तथा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “केंद्र सरकारने मागच्या वर्षी तीन कृषी कायदे लागू केले होते आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत होता. आणि या देशांमध्ये भांडवलशाही वाढते की काय अशी परिस्थिती होती. मी या विभागाचा मंत्री आहे. त्याअंतर्गत मार्केट कमिटीचा जो कायदा आहे. त्यामध्ये त्यांनी काही निर्बंध लावले होते. तसेच काही त्यामध्ये सुधारणाही केली होती. सध्याच्या प्रचलित परिस्थितीमध्ये शेतकरी मार्केटमध्ये माल घेऊन येतो कारण त्याला विश्वास असतो की येथील व्यापारी मला त्याच्या मालासाठी योग्य रक्कम देईल.”

“या नवीन कायद्यामध्ये एपीएमसीच्या बाहेरच्या आवारात सुद्धा व्यवसाय करायची परवानगी होती. एवढेच नव्हे तर त्याच्या लायसन्स बाबतीत सुद्धा कोणतेही निर्बंध नव्हते. आणि म्हणून राज्य सरकारने या कायद्याला विरोध केला. नवीन कायदा करण्यासाठी मंत्रीगण स्थापन केला. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे रद्द केले आणि त्यामुळे देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला, ” अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.