सहकार मंत्र्यांच्या ‘सह्याद्रि’स उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाबद्दल पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाकरीता उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, ऊस, साखर व इथेनॉलवर संशोधन करणार्‍या व साखर कारखानदारीस तांत्रिकसह सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार्‍या, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेने जाहीर केला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे आडिटेड जमाखर्च पत्रकांची छाननी करून सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे.

त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा प्रति क्विंटल साखरेस आलेला रोखीचा उत्पादन खर्च रूपये 366.30 इतका असून तो राज्याच्या सरासरी प्रति यिवंटल रोखीच्या उत्पादन खर्च रू.496.83 पेक्षा मोठ्या फरकाने कमी, तर साखर उत्पादन प्रक्रियेचा खर्च रूपये 813.75 प्रति यिवंटल असून तो ही राज्याच्या सरासरी साखर उत्पादन प्रकियेचा एकूण खर्च रूपये 851.23 पेक्षा कमी असल्याचे छाननीत दिसून आले. तसेच कारखान्याच्या नयत मुल्य/भांडवलाच्या पाया निर्देशांकात भरीव वाढ झाल्याचेही दिसून येत असल्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने नोंद घेतली आहे. यासह विविध निकषांच्या आधारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी कारखान्यास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहिर केलेला आहे.

कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या नियोजनबद्द मार्गदर्शनाखाली, कारखान्याने केलेल्या काटकसरीच्या कारभारामुळे कारखान्यास यापूर्वीही सन 2011-12, 2012-13, 2015-16 आणि 2016-17 या सालात देशपातळीवरील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या संस्थेकडून प्राप्त झाले आहेत. यापूर्वीही सन 2015-16 या सालाकरीता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार देवून गौरविलेले आहे. यासह कारखान्यास देशातून सर्वाधिक साखर निर्यातीचा पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, ऊस विकास पुरस्कार असे अनेक पुरस्कार कारखान्यास यापूर्वी मिळालेले आहेत. सभासदांच्या हितासाठी व प्रगतीकरीता कारखाना व्यवस्थापन सातत्याने काटकरसरीचे प्रयत्न करीत आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच होणार आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.नामदार बाळासाहेब पाटील, व्हा.चेअरमन सौ.लक्ष्मी गायकवाड व सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment