कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यावर्षी ऊसाची पहिली उचल, एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी उद्या दि. 17 रोजी बुधवारी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्रि सहकारी कारखान्यावर रयत क्रांति संघटनेच्या वतीने ठीय्या आंदोलन करणार असल्याची माहिती रयतचे नेते सचिन नलवडे यांनी दिली. याबाबतचे निवेदन आज तळबीड पोलीस स्टेशनच्या एपीआय जयश्री पाटील यांना रयत क्रांति संघटनेच्या वतीने देण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल एकरकमी एफआरपी द्यावी. यासाठी रयतच्या वतीने तहसील कार्यालयावर ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु प्रशासन व साखर कारखानदार यांनी अद्यापही पहिल्या उचलीचा निर्णय घेतला नाही.
सह्याद्रि साखर कारखान्याचे चेअरमन हे सहकार मंत्री असल्याने सह्याद्रि साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी पहिल्यांदा जाहीर करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी साखर कारखाना सुरु होवून 20 दिवस झाले तरी दर जाहीर केलेला नाही.
ऊस दर नियंत्रण कायदा 1966 च्या तरतूदी नुसार ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम दिली पाहिजे असा कायदा आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या कायद्याचा भंग केला आहे. एफआरपीच्या कायद्याचा भंग केला म्हणून सर्व साखर कारखान्याच्या प्रशासन, संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल पोलीस प्रशासनाने दाखल करावेत, अशी मागणी सचिन नलवडे यांनी केली आहे.
सहकार मंत्र्यांनी बॅंकेसाठी कष्ट घेतले तेवढे शेतकऱ्यांसाठी घ्यावेत
सहकारमंत्री जिल्हा बँकेत संचालक असावे अशी शेतकऱ्यांची ईच्छा असल्याचे सांगत आहेत. तशी शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीची इच्छा सहकारमंत्री पूर्ण करणार का? जेवेढे जिल्हा बँकेसाठी सहकार मंत्री जेवढे कष्ट घेत आहेत. तेवढे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी घ्यावे, असे सचिन नलवडे म्हणाले.