केंद्र सरकारच्या घोडचुकीमुळेच देशावर कोळशाचे भीषण संकट : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतामध्ये कोळशाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशामध्ये कोळशाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम वीज निर्मितीवर, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि कारखानदारी होणार असून याची सर्वस्वी जबाबदारी नरेंद्र मोदी सरकारची असून कोळशा आयात करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असून यामध्ये केंद्र सरकारने घोडचूक केली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

देशात कोळशाच्या भीषण तुटवड्यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे. कराड येथे काॅंग्रेस पक्षाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरात कोळशाच्या पुरवठ्याअभावी ‘ब्लॅक आऊट’चा धोका निर्माण झाला आहे. वीज प्रकल्पांना आवश्यकतेनुसार कोळसा मिळत नसल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम पडू शकतो. या कोळशाच्या संकटामुळे अनेक राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज कोळशाचा प्रश्न निर्माण झाल्याने वीज उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. बऱ्याच क्षेत्रात वीज निर्मिती बंद झाल्याने शहरच्या शहरे अंधारात लोटली गेलेली आहेत. कोळशा, खाणी आयात करणे हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मात्र त्यामध्ये केंद्राने घोडचूक केली आहे.