काॅलेज परिसरात पोलिसाला जखमी करून पळालेल्या सराईत गुन्हेगारास अटक

कराड | कराड येथील काॅलेज परिसरात भरदिवसा दुपारी पोलिसांशी झटापट करून सराईत गुन्हेगार पळून गेला होता. यावेळी इनोव्हा कारमधून पळून जात असताना पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत एका पोलिसालाही जखमी झाला होता. या पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रतीक संजय यादव (वय – 22, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, 6 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास कृष्णा कॅनॉलजवळ सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर इनोव्हामधून आलेल्या सराईत गुन्हेगाराची झटापट झाली होती. चालू कारमधून सराईत गुन्हेगाराला बाहेर ओढत असताना दुचाकी घसरून व संशयिताने धक्का दिल्याने पोलीस कर्मचारी साबिर मुल्ला हे जमिनीवर पडल्याने जखमी झाले होते. त्यानंतर संशयितांनी तिथून कारसह पलायन करण्याचा प्रयत्न केला. विद्यानगरमार्गे मसूरकडे जात असताना साई गार्डन हॉटेल समोरील रस्त्यावर ओगलेवाडी कोरोनाच्या दूरक्षेत्राचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक विजय गोडसे कारवाई करत होते. समोर पोलीस दिसताच संशयितांनी रस्त्यात मध्येच इनोव्हा कार सोडून तेथून पलायन केले होते.

पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता. त्यामध्ये कपडे व 5 न वापरलेले सिमकार्ड मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा गाडीचा मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रावरून त्याच्याकडून ज्याला गाडी विकली त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. तेथून पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. तेंव्हापासून पोलिस संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत रहिमतपूर येथे संशयित येणार असल्याची माहिती सपोनि विजय गोडसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः रहिमतपूर येथे सापळा लावला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोन्डाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार प्रवीण काटवटे, रवींद्र पवार, सचिन सूर्यवंशी, किशोर तारळकर, विनोद माने, रूपाली डुबल, धीरज कोरडे, माणिक थोरात यांनी ही कारवाई केली. साबिर मुल्ला यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.

You might also like