हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत आत्तापर्यंत तब्बल 91 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपचा इथे सुफडा साफ झाला आहे. या निवडणुकीपूर्वी च आम आदमी पक्षाने खासदार भगवंत सिंह मान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आता लवकरच ते पंजाबचे मुख्यमंत्री होऊन सूत्रे हातात घेतील. चला जाणून घेऊयात कोण आहेत भगवंत सिंह मान
भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. तेथीलच एसयूएस सरकारी महाविद्यालयातून त्यांनी बी. कॉम (प्रथम वर्ष) केले आहे. भगवंत मान हे पंजाबमधील बहुसंख्येने असलेल्या जाट समुदायाचे नेते आहे. स्पष्ट प्रतिमा आणि बोलण्याची शैली ही त्यांची ताकद आहे
२०१४ साली आपमध्ये दाखल होण्याआधी ते पिपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये होते. २०१२ साली त्यांनी या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नंतर आम आदमी पक्षात गेले. आपमधील प्रवेशानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
२०१९मध्ये संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि २ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी’ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते .
भगवंत मान हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ज्यांनी `द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज,` आणि `काॅमेडी नाईट विथ कपिल शर्मा`, या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. तिथे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. भगवंत मान यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती.
दरम्यान, 117 जागा असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. अंतर्गत वादाचा परिणाम याठिकाणी काँग्रेस ला भोगावा लागला. काँग्रेसला अवघ्या 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर आम आदमी पक्ष 91 जागांवर आघाडीवर आहेत.