औरंगाबाद | शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने शहराच्या सहा एंट्री पॉईंट वर कोरोना चाचण्या वाढवल्या असून तिसऱ्या लाटेत त्रुटी नको म्हणून प्रशासनाकडून तयारी आणि काळजी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसापासून 7 हजार 86 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि यामधून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून दहा ते पंधरा नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत होते. त्यामुळे सरकारी खाजगी आणि महापालिकेने सुरू केलेले आरोग्य केंद्र बंद पडले होते. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून दररोज सरासरी दीड हजार जणांची कोरोना चाचणी केली जाते. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण आता शून्यावर गेले आहे. यामुळे तिसरी लाट शहरापासून अजूनही दूर असल्याचे चित्र दिसत आहे.
मंगळवारी 1 हजार 349 बुधवारी 1 हजार 533 गुरुवारी 1 हजार 565 शुक्रवारी 1 हजार 405 शनिवारी 1 हजार 234 एवढ्या चाचण्या पाच दिवसात करण्यात आल्या. शनिवारी चिकलठाणा येथे 275, हर्सूल टी पॉइंट वर 152, कांचनवाडी येथे 231, झाल्टा फाटा येथे 190, नगर नाका येथे 142, दौलताबाद टी पॉइंट 244 जणांची चाचणी करण्यात आली. गेल्या पाच दिवसांमध्ये 7 हजार 86 चाचण्या करण्यात आल्या असून एकही कोरूना पॉझिटिव्ह आढळला नाही.