औरंगाबाद – कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य शासन आणि व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुल्कमाफी आणि भरणा करण्यात सवलत दिली आहे. तसेच कोरोनाकाळात आई, वडील किंवा पालक गमावलेल्या पाल्यांना संपूर्ण शुल्क माफ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक मंगळवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव यांनी काढले आहे. परिपत्रकात म्हटले की, विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विभाग, उपपरिसर आणि संलग्नित महाविद्यालयांना लागू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आई, वडील किंवा पालकांचे कोविडच्या प्रादुर्भावाने निधन झाले आहे. त्यांचा पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करण्यात येणार आहे. अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील विभागामध्ये आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामधील जिमखाना, विविध गुणदर्शन, उपक्रम, कॉलेज मॅगझीन, संगणक, क्रीडानिधी, वैद्यकीय निधी आणि यूथ फेस्टिव्हल यावरील शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कंटेन्ट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने त्या बाबीसाठी शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचा उपयोग न झाल्यास ते शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयात देखील इतर शुल्कांमध्ये जिमखाना, विविध गुणदर्शन, उपक्रम, कॉलेज मॅगझीन, संगणक, क्रीडा निधी, वैद्यकीय निधी आणि यूथ फेस्टिव्हल या बाबींवर कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात आला नाही. त्याचे शुल्क माफ करण्यात येणार आहे. तसेच इथेही प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
शुल्क भरण्यासाठी सवलत
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन ते चार आठवड्यांत भरण्यात सवलत देण्यात आली आहे. शुल्क थकीत असेल तर, परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.