औरंगाबाद | कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी सर्वच केंद्रांवर तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी रांगेत उभे राहून लसीचा डोस टोचून घेतला. या मोहिमेत लोकप्रतिनिधी देखील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत प्रशासनास सहकार्य करीत आहे. दोन आठवडे ही मोहीम चालणार असून यात तीन लाख नागरिकांना लस देण्याचे टार्गेट पालिकेने निश्चित केले आहे.
लसीकरणाची जम्बो मोहीम राबवण्यासाठी मागील चार दिवसांपासून पालिकेची यंत्रणा केंद्र निश्चित करण्यासह आवश्यक कर्मचारी टीम, लसची व्यवस्था करण्याचे काम करत होती. प्रत्येक केंद्रावर कर्मचारी अधिकार्यांसाठी आवश्यक सुविधा, लसीकरणासाठी येणार्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासह सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले.
शहरातील नऊ प्रभागांत 115 वॉर्डांत 115 लसीकरण केंद्र निश्चित करून याअंतर्गत आरोग्य कर्मचारी-अधिकारी, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षांवरील ज्येष्ठ, 45 वर्षावरील सर्वांना लसीकरण देण्याची जम्बो मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी 109 केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात आली. लसीकरणासाठी 45 वर्षांवरील व्यक्तींना किमान एक ओळखीचा पुरावा आणण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांवर नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला. काही केंद्रांवर प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस देण्यासाठी, मात्र प्रतीक्षा करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले.
मोहिमेदरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत 45 वर्षांवरील 2,761 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. शहरातील सर्वच भागांत लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत प्रशासनास सहकार्य केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी…
सोमवारपासून 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. यात लसीकरणाचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस झाल्यावर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी करावी लागणार आहे. लसीकरणानंतर नागरिकांना काही त्रास झाल्यास संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकार्यांना कळवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.