पुणे प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने तिरूपती येथे झालेल्या ‘१३ व्या राष्ट्रीय संस्कृत छात्रप्रातिभ’ समारोहामध्ये यावर्षी दोन पाऊले पुढे टाकीत सोनेरी कामगिरी केली आहे. दि. ४/२/२०१९ ते दि. ७/२/२०१९ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य या चार पदकांची कमाई पुणे विद्यापीठाने केली.
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती आयोजित ‘राष्ट्रीय संस्कृत छात्रप्रातिभ’ स्पर्धेमध्ये यंदा देशातील ३८ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. गतवर्षी या स्पर्धेत पुणे विद्यापीठाला वैयक्तिक गायनात सुवर्णपदक मिळाले होते. तर एकांकिका स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. यंदा ‘चिंगी’ या मराठी एकांकीकेचे प्रा.निधी वडेर यांनी संस्कृत भाषांतर केलेली ‘रमा’ ही एकांकीका सादर केली होती. या एकांकीकेला सुवर्णपदक मिळाले. या एकांकीकेचे दिग्दर्शन समाधान वाडीकर याने केले होते.
अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखित ‘चिंगी’ या एकांकिकेचा संस्कृत अनुवाद प्रा. निधी वडेर यांनी केला.
वैयक्तिक गायनात मुक्ता जोशी हिने सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळवून परंपरा कायम राखली. चिन्मय पुजारी याने वक्तृत्व स्पर्धेत रौप्यपदक मिळवले तर सामुहीक लोकनृत्यात सादर केलेल्या ‘वारकरी दिंडीला’ कांस्यपदक मिळाले. साक्षी निनगुरकर ,साध्वी मराठे ,श्रद्धा कुलकर्णी, अश्विनी वाघ, अमेय खरे , कृष्णा रामदासी, बालाजी पोटे, कल्याणी कुलकर्णी, राधा मेहता यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग होता.
प्रा. डॉ. दिनेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत भाषा विभागातील बारा जणांचा संघ स्पर्धेकरिता 2 फेब्रुवारीला तिरुपती येथे दाखल झाला होता. आचार्य वि. मुरलीधर शर्मा, डाॅ. एस. मुरलीधरराव, डाॅ. सोमनाथ दाश, डाॅ. सिंहेच् नागराजु यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. पुणे विभागप्रमुख डॉ. शैलजा कात्रे , संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र प्रमुख प्रा. रविंद्र मुळे, प्रा.डॉ. राजश्री मोहाडीकर, प्रा.देवनाथ त्रिपाठी, प्रा. मुग्धा गाडगीळ, प्रा. दिवाकर मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे जल्लोषात स्वागत केले.