सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जावली तालुक्यातील मौजे म्हावशी येथील गावच्या नकाशात असणारी तुटक रेषा म्हणजे पायवाट होती. जर रस्ता करायचा होता तर नकाशावर तुटक रेषा गेली, तेथूनच करायला पाहिजे होता. तसे न करता दुसरीकडून केला. परंतु तुटक रेषा ही संपूर्ण गावातून गेली असताना माझ्या एकट्याच्या गटातून गेली नाही. यामुळे शासनाने नकाशातील ज्या- ज्या गटातून तुटक रेषा गेली तेथून शासकीय खर्चाने रस्ता करून द्यावा. तसे होत नसेल तर तहसीलदार मेढा जावली यांचा सदर रस्त्याचा आदेश रद्द करून चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला रस्ता यांची चौकशी करण्याची मागणी प्रदीप भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जावली तालुक्यातील मौजे म्हावशी येथील गावच्या नकाशात असणारी तुटक रेषा म्हणजे पायवाट होती. ती आत्ता अस्तित्वात असताना नकाशावर असलेल्या पायवाटेच्या तुटक रेषेचा आधार घेऊन म्हावशी गावचे माजी सरपंच यशवंत आगुडे, रकमाजी आगुंडे व 9 जणांनी श्री. रघुनाथ भोसले, श्री. श्रीरंग भोसले, श्री पांडुरंग भोसले व श्री. विठ्ठल भोसले यांच्या विरोधात रस्ता अडवल्याची खोटी तक्रार तहसीलदार यांच्याकडे केलेली होती. याच तक्रारी वरून तहसीलदार मेढा (जावली) यांनी नकाशा नुसार रस्ता न देता नियमबाह्य सव्वा आठ फुटी पाणंद रस्ता करून दिला आहे. रस्ता तयार करताना शेती कामासाठी पाणी पुरवठा करणारा पाण्याचा पाट, सुतार वस्तीचे सांडपाणी वाहून नेणारे गटार, आणि काही झाडे तोडली. हे सर्व करत असताना माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप मानसिक त्रास दिला आहे.
तक्रार अर्जामध्ये नमूद केल्या प्रमाणे स्मशान व तुटक रेषा याचा काहीही संबंध नसताना अर्जाला भावनिक किनार देण्यासाठी स्मशानभूमीचा उल्लेख केला आहे. सदर बेकायदेशीर रस्त्याचा वाद माननीय न्यायालय सातारा यांच्याकडे प्रलंबित असून सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा प्रयत्न शासकीय निधी वापरून करू पहात आहेत. सदर बेकायदेशीर रस्त्याचा वापर गावातील कोणालाही होत नसून फक्त स्वतःचे वाहन आपल्या दरवाजा समोर नेता यावे हा हेतू ठेवून आणि वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सरकारी पैसा व यंत्रणा याचा गैरवापर राजकीय दबाव आणून यशवंत आगुंडे व रखमाजी आगुंडे करत आहेत. एवढे करूनही समाधान झाले नाही म्हणून बेकायदेशीर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे म्हणून अर्ज दाखल केला आहे.
तहसीलदारांचा आदेश रद्द करून न्याय द्यावा : प्रदीप भोसले
माझे आजोबा स्वर्गीय श्री. रामजी भोसले व वडील श्री. रघुनाथ भोसले व चुलते यांनी गावच्या विकासासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिर, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी विना मोबदला जागा दिली. एवढं करून सुध्दा आमच्यावर अन्याय होतो, हे आमचं दुर्दैव आहे. यामुळे शासनानेच आता न्याय मिळवून द्यावा व मंडल अधिकारी व तहसीलदार यांना हाताशी धरून केलेला रस्ता काढून संबधीतावर कारवाई करुन नकाशा प्रमाणे रस्ता करून मिळावा. तसे होत नसेल तर तहसीलदार जावली मेढा यांचा आदेश रद्द करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रदीप भोसले यांनी केली आहे.