सातारा प्रतिनिधी | गावामध्ये यात्रा भरवून नागरिकांना मंदिरात येण्याचे आवाहन करणार्या जावळी तालुक्यातील संरपंचाविरोधात मेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील वालुथ ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वालुथ (ता. जावळी) येथे ग्रामदैवत यात्रा दि. 21 व 22 रोजी होती. जगावर आलेले महामारीचे संकट टाळण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक, वैयक्तिक, घरगुती व शासकीय कार्यक्रम करू नये म्हणून शासनाने जमावबंदी आणि लॉक डाऊन केले आहे. यात्रे निमित्ताने ग्रामस्थांनी काळजीपोटी दि. 20 रोजी मंदिराला कुलूप लावले होते. मात्र दि.21 रोजी रात्री 9 वाजता सरपंच समाधान पोफळे यांनी मंदिरांची कुलूपे काढली. आणि ग्रामस्थांनी दर्शनास यावे असे त्यांनी लाऊडस्पीकर वरून आवाहन केले.
कोठेही जत्रा भरवण्यास मनाई असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत जावळी तालुक्यात अगोदरच कोरोनाचा आकडा वाढत असताना वालुथ येथील सरपंचांने यात्रा भरवली असल्याची तक्रार गावातील काही लोकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे केली. त्यानंतर मेढा पोलीस स्थानकामध्ये वालुथ गावचे सरपंच समाधान जगन्नाथ पोपळे, संजय गणपत चव्हाण भीमराव बबन पोफळे, प्रकाश बाजीराव पोफळे, नामदेव वामन पोफळे, अनिल भीमराव पोफळे, अमरदीप अंकुश तरडे असे एकूण सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वालूथ येथील प्रदीप गोळे यांच्यासह गावातील 20 लोकांनी अर्ज दाखल केला होता. अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड करत आहे.