हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.
परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेले नाही, त्याचा 17 वा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे, रहिवासी दाखला असणेही आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही??
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अटीनुसार, पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि त्यावर शेती केली तर अशा शेतकऱ्याला ही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीची मालकी आवश्यक आहे. परंतु , शेतकरी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने घटनात्मक पद भूषवले असेल तर त्याला ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.