पुणे | नवनाथ मोरे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. शांता रानडे यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी सुषमा दातार, जावई, डॉ.अभय दातार आहेत.
महाविद्यालयीन काळात त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या आणि मार्क्सवादाकडे आकर्षित झाल्या. शांताबाईंचे शिक्षण एस.एन.डी.टी महाविद्यालयात झाले. १९४७ पासून मृत्युपर्यंत त्या भाकपच्या सक्रिय सदस्य होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या त्या काही काळ सदस्य होत्या. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, भाई विष्णुपंत चितळे, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. गीता मुखर्जी आदिंसोबत त्यांनी काम केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यात त्यांचा सहभाग होता आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. तसेच पक्षाच्या विविध आंदोलनांदरम्यान देखील त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. कॉ. रानडे यांचा भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक महिला समिती आदि विविध महिला संघटनांच्या कामात सक्रीय सहभाग होता. तसेच पुण्यातील विविध डाव्या लोकशाहीवादी संस्था-संघटनांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. गेली अनेक वर्ष पुण्यात आयोजित होत असलेल्या लोकशाही उत्सवाच्या आयोजनात त्या पहिल्यापासून सहभागी होत्या.