हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 वाजताची वेळ होती. मात्र, या ठिकाणी प्रश्न पत्रिकाच पोहचल्या नसल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने आज परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठीची वेळ सकाळी दहा वाजताची होती. नियमित वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. मात्र, या ठिकाणी पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचे त्यांच्या समोर आल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. तर, काही जणांना प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत.
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन- दोन वेळा परीक्षा द्यायला लागत असून सिंधुदुर्ग, बीडमधून आलेल्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विद्याऱ्यांनी तीन तीन हजार रुपये खर्च करून परीक्षेसाठी आले असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.