Sunday, June 4, 2023

सांगली महापालिका पोट निवडणूक आचारसंहितेवरुन संभ्रम, पदाधिकारी आणि प्रशासनापुढे पेच

सांगली । महापालिकेच्या प्रभाग क्र.16 च्या पोटनिवडणूकीच्या निवडणूक आचारसंहितेवरुन निवडणूक आयोगाने संभ्रम वाढवणारे आदेश काढल्याने स्थायी सभा, महासभा होणार का? याबाबत पदाधिकारी ,प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने, स्थायी सभापती यांनी शासनाचे मार्गदर्शन मागवले आहे, तर नगरसचिवांनी विधी विभागाचा अहवाल मागवण्याची शक्यता आहे. एका पोटनिवडणूकीमुळे तब्बल 15-20 कोटीची विकास कामे थांबण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी प्रदिप परब यांनी 23 रोजी महापालिका आयुक्तांना याबाबतचे एक आदेश दिले आहेत,यात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या 14-102016च्या अधिसुचनेनुसार ‘जे काम एखाद्या विशिष्ठ भागाशी संबधित नसेल असे कोणतेही काम हाती घेण्यास बंदी राहणार नाही’ नमूद केले असून तो विशिष्ठ भाग म्हणजे प्रभाग क्र.16-अ हा समजण्यात यावा, असे म्हटले आहे.

वास्तवीक या आदेशानुसार निवडणूक आचारसंहिता प्रभाग क्र.16-अ पुरती असावी वरवर भाबडी कल्पना पदाधिकारी,नगरसेवक यांची झाली अथवा होत असली तरी प्रशासन तसा निर्णय घ्यायला तयार नाही. प्रशासन म्हणते महासभा,स्थायी सभा घ्या,मात्र कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नका असे सांगत आहे.विशिष्ठ भाग म्हणजे प्रभाग क्र.16-अ असले तरी अन्य भागातील कामासाठी निर्णय घेताना कुणी तक्रार केली,तर सर्व कामेच रद्द होतात. ही भिती असल्याने पदाधिकारी,नगरसेवकापुढे पेच निर्माण झाला आहे. स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी स्थायी सभा काढा असे नगरसचिवांना सुचवले असले तरी नगरसचिव सभा काढतील अशी शक्यता नाही.

दीड- वर्षानी महासभा ऑफलाईन होणार असल्याने सभा घ्या असे नगरसेवक आग्रह करीत आहेत, महापौरांना अडचणीत आणण्यासाठी अनेक सदस्य अभ्यास करुन बसले आहेत,मात्र पोटनिवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि महापालिकेचे कार्यालय ज्या प्रभागाची पोटनिवडणूक आहे,त्याच प्रभागात असल्याने महासभा रद्द झाली आहे. पोटनिवडणूकीची आचारसंहिता ही प्रभागापुरती असल्याने स्थायी सभा घ्या अशी सदस्यांची मागणी आहे, मात्र एखाद्याने हरकत घेतली तर अडचण निर्माण होऊ शकते,यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.