अभिनंदन! औरंगाबादची स्मार्ट सिटी बस देशात प्रथम क्रमांकावर; केंद्राकडून अवार्डची घोषणा

औरंगाबाद | औरंगाबाद स्मार्ट सिटी बसला देशातून पहिला क्रमांक मिळाला असून अर्बन मोबिलिटी गटातून इंडिया स्मार्ट सिटी अवार्ड (आयएसएससी) 2020 हा औरंगाबादचा सिटी बसला मिळणार असल्याची घोषणा शुक्रवारी भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केले. ही औरंगाबाद करांसाठी कौतुकाची बाब आहे. स्मार्ट सिटीज मिशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

जानेवारी 2019 मध्ये शहरवासीयांना माझी स्मार्ट बस प्रकल्पाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शहरातील नागरिकांनी या स्मार्ट सिटी बसला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर हळूहळू सिटी बसेसची संख्या वाढविण्यात आली. शहरातील विविध भागात व 30 मार्गावर 100 बसेसने एका दिवसात 22 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. आतापर्यंत स्मार्ट बसणे 52 लाख किलोमीटर धावत 87 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवेचा लाभ दिला आहे. एका दिवसात 15 हजार प्रवाशांनी सिटी बस मधून प्रवास केल्याचा उच्चांक आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी शहरात विविध मार्गावर 150 मार्ट बस थांबे आणि चारशे चिन्हांचे खांब बसविण्यात आले आहेत.

या पुरस्काराबद्दल मनपा आयुक्त आणि प्रशासक पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीमचे अभिनंदन केले. तसेच याचे श्रेय औरंगाबाद मधील नागरिकांनाच असल्याचा उल्लेख पांडेय यांनी केला शहरवासीयांनी स्मार्ट बसचा व योजनांचा डिजिटल सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.