अभिनंदनीय : MPSC परिक्षेत कराडचा प्रसाद चाैगुले राज्यात पहिला

कराड | राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सन 2019 रोजी झालेल्या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी गावच्या प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रावर घेण्यात आली होती. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी 6 हजार 825 विद्यार्थी बसले होते. त्यामध्येही प्रसाद चौगुले पुन्हा राज्यात प्रथम आला आहे.

याबाबत प्रसाद चाैगुले म्हणाला, माझ्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आई-वडील, तसेच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा मार्ग दाखवणारे भाऊजी यांच्यासह अनेकांनी केलेली मदत, मी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाचा आनंद खूप मोठा आहे. आई-वडील, भाऊजी प्रमोद चौगुले यांनी स्पर्धा परीक्षेचा दाखवलेला मार्ग व त्यासाठी करायला लावलेले नियोजन महत्वाचे ठरले. महाविद्यालयातील मित्रांसह सर्वांची मदत व माझ्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटते. प्रसादच्या यशाबद्दल त्याचे सहकार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच परिषदेचे शंकरराव खापे यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.