हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या वेगवेगळ्या दरावरून आता वाद निर्माण होत आहे. कोरोनाची लस केंद्राला अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. हीच लस राज्यांना 400 रुपयांमध्ये खरेदी करावी लागणार आहे. कोरोना लसीतील हा दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे
अशोक चव्हाण म्हणाले, “मुळातच केंद्राच्या तुलनेत राज्यांची आर्थिक क्षमता कमी आहे. राज्यांचे आर्थिक स्त्रोतही मर्यादीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता लसीच्या दरांचा केंद्र व लस उत्पादकांनी पूनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. एकट्या महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे 5.50 कोटींच्या घरात आहे. प्रत्येक नागरिकाला 2 लसी द्यायच्या असल्याने महाराष्ट्राला एकूण 11 कोटी लसी खरेदी कराव्या लागतील. एका लसीची किंमत 400 रुपये या दराने महाराष्ट्राला 4 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यासाठी खर्च करावी लागेल.”
हा खर्च कमी झाल्यास अगोदरच आर्थिक कोंडीत फसलेल्या राज्यांना दिलासा तर मिळेलच; शिवाय उर्वरित रक्कम कोरोनाच्या इतर उपाययोजना व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी देणे शक्य होऊ शकेल असे अशोक चव्हाण यांनी म्हंटल.