पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार दुष्काळ पाहणी दौरा करणार; पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाखाली उद्या कराडात बैठक

0
1
congress drought inspection
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन मिटिंग उद्या दिनांक 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह,कराड (Karad) येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत.अनेक शहरांना 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागवार समिती गठीत केली आहे.

यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदाची जबाबदारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांची दुष्काळ पाहणी समिती मध्ये 13 सदस्य आहेत. यामध्ये माजी मंत्री आ. सतेज पाटील, माजी मंत्री आ. विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. विक्रमसिंह सावंत, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे, आ. रवींद्र धंगेकर, आ. जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. अशी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून सर्व समिती सदस्यांना कराड हे सोयीचे आहे. यामुळे कराडमध्ये उद्या दिनांक 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. कराड मध्ये या मिटिंग चे आयोजन केल्याने विशेष महत्व या मीटिंगला आले आहे. या मिटिंगमध्ये लोकप्रतिनिधी सदस्यकडून त्यांच्या जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थिती बाबत माहिती मागवली असून त्यानुसार दुसऱ्या टप्यात मिटिंग नंतर 2 दिवसानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा सुद्धा आयोजित केला जाणार आहे आणि यासाठी या नियोजन मिटिंग चे आयोजन करण्यात आले आहे.