‘केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं’ आताचं ठरवा!; उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी लढायचं की घाबरून राह्यचं? हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना केला. सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी हा सवाल केला.

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. आजच्या बैठकीत जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी बैठकीत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत?”. राज्यातील लॉकडाउन शिथील केला जात असतानाही शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. उद्धवजी, तुम्ही कोरोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगताच, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केलं. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की घाबरून राह्यचं हे ठरवलं पाहिजेत, असंही सांगितलं.

येत्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांची थकबाकी मिळावी म्हणून जीएसटी परिषदेवर आणि पर्यायाने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेसने ही बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे. तसेच देशात सक्षम विरोधी पर्याय उभा करण्यासाठीही सोनिया गांधी यांनी मित्र पक्षांना विश्वासात घेण्यास सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, या बैठकीत देशातील विरोधी पक्ष कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. मात्र, तेच होताना दिसत नाही, असं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्रसरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केंद्र सरकार केवळ त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पक्षांना मदत करत असून इतर राज्यांना ठेंगा दाखवत असल्याचा आरोपही सोरेन यांनी केला.

तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. आपण जवळपास ५०० कोटी खर्च केले आहेत. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जिथे राज्यांची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारने जीएसटी नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. आपण एकत्रितपणे पंतप्रधानांना सामोरं गेलं पाहिजे या ममता बॅनर्जींच्या मताशी मी सहमत आहे”.

“११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं सांगितलं. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. तर सर्व राज्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी विनंती यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली.

“माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाऊया आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment