मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे आमदार काँग्रेसला सोडून जाण्याचे सत्र अद्याप थांबत नसून सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आता शिवसेनेत जाणार आहे. आज उद्धव ठाकरे यांची त्यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तसेच त्यांनी राजकीय स्थितीवर एक तास उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. अब्दुल सत्तार हे भाजप मध्ये करण्याच्या पवित्र्यात असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अब्दुल सत्तार यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्पर असून त्यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध होत असल्याने त्यांचे पुनर्वसन शिवसेनेत केले जाणार आहे असे बोलले जाते आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार म्हणून अब्दुल सत्तार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सिल्लोड नगरपरिषद त्यांनी मोठ्या कसोटीने काँग्रेसकडून निवडून आणली. मात्र पक्षाने त्यांची कदर केली नाही. त्यांचे म्हणणे कधीच एकूण घेतले नाही. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला चांगलेच खेचले होते. काँग्रेसच्या धोरणावर त्यांनी टीका करून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर असे वाटत होते कि औरंगाबादची लोकसभा निवडणूक पंचरंगी होणार मात्र अब्दुल सत्तार यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज काढून घेतला. मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात अब्दुल सत्तार यांचे अस्तित्व नपुसता येणारेच आहे. आता ते शिवसेनेतून आपल्या राजकारणाची दुसरी विनिंग खेळणार आहेत.