आघाडी सरकार जावे म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवतायत; बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक कारणे शोधत हल्लाबोल केला जात आहे. यावरून आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला. काहीजण महाविकास आघाडी सरकार कधी जातेय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तर काहीजण रोज स्वप्न पाहत असून स्वप्नातही ते बडबडत आहेत, असा टोला थोरात यांनी लगावला.

काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी कितीही आणि काहीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार दोन वर्ष चालले आहे. पुढील तीन वर्ष देखील टिकणार आहे. आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून पुन्हा निवडून येऊ. आमचे सरकार आले, सात जणांचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केले.

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारचे काम चागलया पद्धतीने सुरु आहे. त्यामागे खरे कोणते कारण असेल तर त्याला उद्धव ठाकरेंचे व्यक्तिमत्व कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. आमचे सरकार अजून अनेक वर्षे उत्तम रीतीने चालणार आहे. काहीजण सरकार पडावे म्हंणून स्वप्नेही पाहत असल्याचा टोला थोरात यांनी भाजप नेत्यांना लगावला.

You might also like