लोणंद | पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक म्हणून गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानात येऊन, सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून, आपला लढाऊ पणा खंबीरपणे दाखविणारे तसेच अभ्यासपूर्ण पद्धतीने जनतेसमोर मांडणी करणारे काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अॅड.बाळासाहेब
ऊर्फ शमशुद्दीन मकबूलभाई बागवान (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले असून त्यांच्या जाण्याने काँग्रेसलाच नव्हे तर बाळासाहेबांच्या कार्यपध्दतीवर नितांत प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचे मोठे नुकसान झालेले आहे.
अॅड.बाळासाहेब बागवान हे महाराणी सईबाई हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष, तसेच लोणंद हमाल पंचायततीचे अध्यक्ष शिवाय लोणंद नगरीचे विद्यमान नगरसेवक होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कामकाज पाहिलेले आहे. गेली अनेक वर्षे संघर्ष करीत उभे राहिलेले नेतृत्व हे जनसामान्यांसाठी आपला मोठा आधार होता. अॅड.बाळासाहेब बागवान यांनी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारला.त्याच लढ्यातून संघर्ष करण्याची खूप मोठी प्रेरणा ही खंडाळा तालुक्यातील जनतेने त्यांच्याकडून घेतलेली आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व जाती धर्मातील लोकांचा सन्मान त्यांनी केलेला आहे. श्री.गणेश मंदिर ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांनी लोणंदमध्ये सामाजिक सलोखा कायम अबाधित ठेवला.पुरोगामी विचारांवर नितांत प्रेम करणारे बाळासाहेब कायम पुरोगामीपणाचे विविध दाखले देत असायचे. ते काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे कायम जनतेमध्ये मांडत राहिले. महाराष्ट्र्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध असून या दोघांमध्ये वारंवार राजकीय घडामोडीं बाबत तसेच लोणंदच्या विकासाबाबत चर्चा घडत असायच्या.
राज्यातील अनेक काँग्रेस मंडळींशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपलेले असताना लोणंद नगरीच्या विकासासाठी ते कायम धडपड करीत असायचे. विविध आंदोलने मोर्चे करीत असताना ते जनतेशी संवाद साधत समस्येच्या अगदी मुळाशी जाऊन बारकाईने मांडणी करायचे. लोणंदच्या राजकारणात एक हुशार आणि बुद्धिमान नेतृत्व म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोणंदच्या हिताच्या दृष्टीने विकासक अशीच ध्येय धोरणे राबवली. लोणंद सह जिल्ह्याच्या राजकारणात एक सक्षमपणे तसेच प्रभावी नेतृत्वाने विविध आंदोलने मोर्चे संघर्ष करीत असताना त्यांनी एक वेगळाच ठसा निर्माण केला.सर्वसामान्य गोर-गरीब कष्टकरी, शेतकरी कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम त्यांच्या साठी खंबीर उभे राहून लढणारे अॅड.बाळासाहेब बागवान हे आज ह्यात नसले तरी त्यांनी जनतेच्या मनात, हृदयात निर्माण केलेले स्थान त्यांच्या कार्याची आठवण ही कायम करून देणारी ठरेल.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group