व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला आहे.

“कोविड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा आयसीएमआरचा दावा अवास्तव आहे. लॉकडाउनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहीजे,” असं चव्हाण आणि ट्विट करत म्हटलं.

दरम्यान, भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लाँच करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, या घोषणेवरून चव्हाण यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”