Sunday, May 28, 2023

हे सरकार गरीब विरोधी, आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून कमाई करणारे आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं नुकतेच एक समोर आलं आहे. या वृत्तावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील सरकार हे गरीबांच्या विरोधातलं असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत सरकार नफेखोरी करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं एक वृत्त राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. “आजाराचे ढग सर्वांच्या डोक्यावर आहेत. लोकं संकटात आहेत. त्याचा फायदा करून घेऊ शकतो. आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून गरीब विरोधी सरकार कमाई करत आहे,” असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

म्हणून सुरु करावी लागली होती विशेष श्रमिक ट्रेन
काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमुळे निरनिराळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सरकारनं श्रमिक ट्रेन सुरू केल्या होत्या. लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी लाखो स्थलांतरित मजुरांनी लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असल्याने प्रसंगी पायी तर सायकल सारख्या मिळेल त्या साधनाने हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या घरची वाट धरली. दरम्यान, देशातील विविध महामार्गांवर स्थलांतरित मजुरांचे हजारोंचे पायी लोंढे दिसू लागल्यानंतर सरकारने अखेर महिन्याभरानंतर विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरु केल्या. या विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांना दिलासा मिळाला.

मात्र, लॉकडाउनकाळात हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वेने श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटींची कमाई केल्याचे वृत्त येताच विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी त्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांच्या दरावरूनही वाद उफाळला होता. कामगारांकडून कोणत्याही प्रकारचं भाडं आकारलं जात नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. तसंच याची ८५ टक्के रक्कम रेल्वेनं तर १५ टक्के रक्कम ज्या राज्यांमधून प्रवासी मजदूर जात आहेत त्या राज्यांकडून आकारल्याचं सांगण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”