चीन प्रकरणात पंतप्रधान देशापासून काय लपवत आहेत? राहुल गांधींचा मोदींना गंभीर सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारच्या माहिती लपवा धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. “आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?,” असा गंभीर प्रश्न राहुल गांधी मोदींकडे उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. “पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ३ आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment