हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं म्हणत मोदी सरकारनं चीनसमोर गुडघे टेकल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी एकप्रकारे सेनेच्या बलिदानावर थुंकले असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘काल संरक्षणमंत्र्यांऐवजी पंतप्रधान मोदींनी यावर भाष्य का केलं नाही?’ असा प्रश्नही राहुल गांधींनी विचारलाय.

काल संरक्षण मंत्र्यांनी पूर्व लडाख भागातील परिस्थितीवर एक वक्तव्य केलं. त्यातून समोर आलं की आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील. परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे. आता आपण फिंगर ४ वरून फिंगर ३ वर आलेलो आहोत. मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.

‘एप्रिल २०२० मध्ये जी परिस्थिती होती तशीच पूर्ववत व्हावी, यासाठी भारत सरकारकडून वाटाघाटी केली जाऊ शकली असती. परंतु, हे सरकार विसरलं. चीनसमोर नरेंद्र मोदींनी आपलं शीर झुकवलं, माथा टेकला. आपली जमीन फिंगर ४ पर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्याड आहेत जे चीनसमोर उभे राहू शकले नाहीत. हेच सत्य आहे. ते सेनेच्या बलिदानावर थुंकत आहेत, हेच ते सांगत आहेत. त्यांनी सेनेच्या त्यागाचा अपमान केलाय. भारतात कुणालाही असं करण्याची परवानगी देता कामा नये’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

सैन्य माघारीमुळे भारताला काय मिळालं? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मजबूत स्थितीत पोहचल्यानंतर सेनेला मागे हटण्यासाठी का सांगण्यात आलं? खूप मेहनतीनंतर भारतीय सेनेनं काहीतरी मिळवलं होतं, आता मात्र त्यांना मागे हटण्यास सांगण्यात आलं. याच्या मोबदल्यात भारताला काय मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देपसांग प्लेन्स भागात चीनी का मागे हटले नाहीत? ते गोगरा आणि हॉट स्प्रिंगमधूनही का मागे हटलेले नाहीत? हिंदुस्तानची पवित्र भूमी नरेंद्र मोदींनी चीनच्या हातात सोपवली आहे आणि हेच सत्य आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलंय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like